वरणगाव शहरात दोन ठिकाणी घरफोडी
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील मकरंद नगरासह रेणुका नगरात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम लांबवली. बुधवारी मकरंद नगरातील विशाल गजानन जोशी हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रात्री चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला व कपाटाचे कुलूप तोडून पाच हजारांची रक्कम लांबवली तर तर दुपारच्या वेळी रेणुका नगरातील प्रतिभा नितीन वराडे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या घरातील रोख रक्कम अंदाजे सात हजार व सोन्याचे दागिने लांबवण्यात आले. पोलिसांनी तत्काळ जळगाव येथून श्वान पथकाला पाचारणा केले असता डॉग स्कॉडमधील संदीप परदेशी व मनोज पाटील यांनी चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश शेळके करीत आहे.

