ईडी लावली तर सीडी लावेल : माजी मंत्री खडसे
राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने शरद पवारांचे मानले आभार
मुंबई : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी मुंबईत खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याप्रसंगी खडसेंनी भाषणात सांगितले की, गत विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन करण्यात आले मात्र 40 वर्ष ज्या पक्षात काम केले तो पक्ष सोडण्याची एकाएकी इच्छा होत नव्हती. माझा काय गुन्हा असेल तो सांगावा, असे मी वारंवार पक्षाकडे विचारले मात्र अद्यापही मला उत्तर मिळालेले नाही. मी गैरव्यवहार केला असेल तर कागदपत्र मला द्या, असेही ते म्हणाले. राजकारणात येताना मंत्री मंडळातही संघर्ष करावा लागला व संघर्ष हा माझा स्थायी भाव आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कधीही केले नाही, महिलेला समोर ठेवून राजकारण केले नाही. मी लेचापेचा नाही, असेही खडसे म्हणाले.
ईडी लावाल तर सीडी लावेल
खडसे म्हणाले की, माझ्यामागे ईडी लागली तर मी सीडी लावेल, असे सूचक विधानही त्यांनी केले. 40 वर्षात भाजपा जशी वाढवली तशी दुपटीने राष्ट्रवादी वाढवणार असल्याचे ते म्हणाले. पक्ष चिन्हावर अनेक पदाधिकारी निवडून आले असल्याने ते तूर्त पक्षात प्रवेश करणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले मात्र जळगावात भव्य कार्यक्रम घेवून आपली ताकद दाखवून देणार असल्याचे ते म्हणाले. कुणी किती भूखंड घेतले हे दाखवून देणार असल्याचे त्यांनी कुणी-कुणी काय-काय केले हे दाखवून देईल, सरकारकडे मी मागणी करणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता हलके-हलके वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. हीन राजकारण करणार्यांची आपण साथ सोडल्याचे त्यांनी सांगितले.


यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
प्रसंगी खडसेंसह माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, बोदवड मार्केट कमेटीचे सभापती निवृत्ती पाटील, कैलास सूर्यवंशी (चाळीसगाव), राजू माळी, भाजपा सरचिटणीस संदीप देशमुख, मधुकर राणे, मंदाताई खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
