भुसावळातील खंडणीखोरांचा तत्काळ बंदोबस्त करा
भारतीय जनता पार्टी जळगाव वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकार्यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
भुसावळ : ये हमारा एरीया है, आपको यहाँ हॉस्पिटल चलाना है, तो हमे हप्ता देना पडेगा, नहीं तो अस्पताल बंद कर देंगे, अशी चाकूच्या धाकावर धमकी देत भुसावळातील डॉ.स्वप्नील कोळंबे यांना 12 ऑक्टोबर रोजी कुविख्यात आरोपींनी धमकावले होते व त्यानंतरही सातत्याने हा प्रकार सुरू असल्योन या प्रकरणी 21 ऑक्टोबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात खाकीचा धाक आता कमी होत असून प्रत्येक आठवड्यात खून, विनयभंग, दरोडा, चोरी, बलात्कार, मारामारी आदी घटना घडत असतानाच आता डॉक्टरांनाही खंडणी मागितली जात आहे. सावद्यातील डॉ.सुनील चौधरी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये तोडफोड आणि दगडफेक करण्यात आल्याने दोषी आरोपींसह खंडणीखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, जळगाव वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकार्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
या मागण्यांसाठी दिले निवेदन
खंडणीच्या गुन्ह्याबाबत जलद तपासचक्रेते फिरवून गुन्हेगारांना अटक करावी, हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपींना कठोरपणे शिक्षा देण्यात यावी, डॉ.कोळंबे, डॉ.चौधरी आणि परीवाराला शासकीय खर्चाने संरक्षण देण्यात यावे, भुसावळ शहरात मिलिटरी, पॅरामिलीटरी, राखीव पोलिस यंत्रणा यांची मदत घेत हत्यारे, गावठी कट्टा, तलवारी आदींबाबत शोध मोहिम राबवावी, सर्व डॉक्टर मंडळींना स्वरक्षणार्थ हत्यारे वापरण्याची कायदेशीर परवानगी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, गृहमंत्री, पालकमंत्री आदींना पाठवण्यात आली आहे. निवेदन देताना भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे, आमदार राजूमामा भोळे, सहसंयोजक डॉ.नितु पाटील, उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकू, महानगर अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील, सरचिटणीस डॉ.जीवन पाटील आदी उपस्थित होते.

