मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता : सुनील काळे


भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अनेक कार्यकर्तेही राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. वरणगाव नगरपरीषदेवरही भाजपाची सत्ता असून या संदर्भात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असून भाजपात राहणार असल्याचे ते म्हणाले. वरणगाव नगरपरीषदेच्या नगराध्यक्षपदाच्या वेळी मला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न झाला. खरं तर माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर हा अन्याय होता. सन्माननिय नगरसेवकांच्या साथीने व माजी मंत्री गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मी नगराध्यक्ष झालो. मी एकनिष्ठ असतांनाही मला बंडखोर म्हणून हिणवले गेले. मी हा सारा अपमान गिळून माझ्या वरणगावच्या विकासासाठी झटलो आणि वरणगाव शहर विकासाच्या दृष्टीने बदल घडविण्यात यशस्वी झालो ते माझ्या महाराष्ट्रात तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळेच, असेही त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे. भाजपाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी रात्रं-दिवस प्रामाणिकपणे जीवाचे रान करणार असल्याचेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !