सावद्यात रुग्णालयाची तोडफोड : चौघांविरुद्ध गुन्हा
सावदा : शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोड प्रकरणी चौघांविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या अटकेसाठी रावेर-यावल तालुक्यातील संघटना आक्रमक झाल्या आहेत. सावदा येथील इम्रान शेख नामक 28 वर्षीय तरुणास काहीतरी चावल्याने त्यास सावदा येथील डॉ.सुनील चौधरी यांच्या रुग्णालयात आणण्यात आले मात्र रुग्णास श्वास घेण्यास अडचण होत असल्याने तसेच त्याची तब्येत सिरीयर असल्याने त्यास अन्य मोठ्या रुग्णालयात हलवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र रस्त्यातच या रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णाच्या काही नातेवाईकांनी 23 रोजी रुग्णालयात येवून तोडफोड तसेच डॉक्टराना शिवीगाळ तर त्यांचे भावास देखील मारहाण करून धमकी दिली होती तसेच ओपीडी ड्रावरमधून चार हजार रुपयेदेखील काढून नेले होते. या प्रकरणी डॉ.सुनील काशिनाथ चौधरी यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी शेख सादिक शेख शब्बीर, शेख अर्बाज शेख रऊफ, शेख अज्जू शेख अय्युब, शाहरुख मेहमूद मन्यार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.

