धुळ्यातील विकास बँकेला दोन कोटींचा चुना लावणारी टोळी एलसीबीच्या जाळ्यात
नायजेरीयन आरोपीसह दिल्ली व युपीतील पाच आरोपींना अटक : सहा लाखांचा मुद्देमाल जप्त : आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची आशा
धुळे : बँक खाते हॅक करणारी पाच जणांची अट्टल टोळी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली आहे. अटकेतील आरोपींमध्ये नायजेरीयन आरोपीसह अन्य दिल्ली व युपीतील चौघा आरोपींचा समावेश आहे. आरोपींना धुळ्यातील अॅक्सिस बँकेत धुळे विकास बँकेचे सुरू असलेले खाते 8 जून 2020 रोजी हॅक करीत ऑनलाईनद्वारे देशभरातील 117 बँक खात्यात तब्बल दोन कोटी सहा लाख 50 हजार 165 रुपयांची रक्कम परस्पर वर्ग केल्याप्रकरणात अटक करण्यात आली. आरोपींनी आणखी देशभरात अशाच पद्धत्तीने गुन्हे केल्याचा दाट संशय असून आणीख काही गुन्हे उघडकीस येण्याची आशा आहे.
या आरोपींना केली अटक
दीपक राजुकार चित्रा (29, जुने महावीर नगर, नवी दिल्ली), नितीका दीपक चित्रा (30, जुने महावीर नगर, नवी दिल्ली), टोबॅचिकू जोसेफ ओकोरो उर्फ प्रेस (23, अंसल हाऊसिंग, ग्रेट नोएडा, यु.पी.), रमणकुमार दर्शनकुमार (30, रा.तिलक नगर, नवी दिल्ली), अवतारसिंग उर्फ हॅप्पी वरेआमसिंग (28, तिलक नगर, नवी दिल्ली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, अटकेतील आरोपींना 25 ऑक्टोबर रोजी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सायबर तज्ज्ञ व्रजेश गुजराथी, सहा.निरीक्षक श्रीकांत पाटील, उमेश बोरसे, सारीका कोडापे, हनुमान उगले, संजय पाटील, रवी माळी, संदीप पाटील, अशोक पाटील, श्रीशैल जाधव, सुनील मपाटील, मनोज महाजन, मनोज बागुल, विशाल पाटील, उमेश पाटील, रेणुका भानगुडे आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

