खडसेंसोबत बडे नेते न गेल्याने त्यांच्या जाण्याने फरक पडणार नाही
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माध्यमांना माहिती
जळगाव : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत पक्षातील कोणीही आमदार, खासदार किंवा बडे नेते गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत त्यामुळे खडसेंच्या जाण्याने पक्षाला फार फरक पडणार नाही, असे मत माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. जळगाव शहरातील भाजप कार्यालयात पक्षाची बैठक झाली, त्यावेळी ते माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपला उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात उतरती कळा लागणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत शिवाय राष्ट्रवादी प्रवेशावेळी खडसे यांनीदेखील लवकरच आपली ताकद दाखवत देणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर जळगावात माजी मंत्री महाजन यांना छेडले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे, कोणाच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही. खडसे यांच्या जाण्याने भाजपला फार नुकसान होईल, असे वाटत नाही असेही त्यांनी सांगत जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगरमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याने ते कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.

