भुसावळच्या सरकाटे स्मृती प्रतिष्ठानतर्फे नांदुर्यात रविवारी रंगणार गजल मुशायरा

जामनेरच्या अशोक कोळींना उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करणार
भुसावळ- कवयित्री शेवंताबाई सरकाटे स्मृती प्रतिष्ठान व साहित्य सेवा प्रज्ञामंच ग्रुपतर्फे नांदुर्यात रविवारी गजल मुशायरा रंगणार आहे. नवगजे मंगल कार्यालय, सिनेमा रोड (नांदुरा, जिल्हा बुलडाणा) येथे दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान हा कार्यक्रम होईल, अशी माहिती आरपीएफचे निवृत्त आयुक्त तथा साहित्यिक रमेश निनाजी सरकाटे यांनी दिली.
भुसावळ येथील शारदा नगरातील निवासस्थानी बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. गजल मुशायर्यापुर्वी सकाळी 10.30 वाजता ग्रंथदिंडी, 11 वाजता राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन होईल. मुंबईचे गजलनवाज भिमराव पांचाळे प्रमुख पाहुणे असतील.ज्येष्ठ कादंबरीकार दिनकरराव दाभाडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.
यांची राहणार प्रमुख उपस्थिती
जळगाव येथील साहित्यिक प्रा.डॉ. किसन पाटील, नरेंद्र लांजेवार, डॉ. सिद्धार्थ मेश्राम, प्रशांत वंजारे, सुरेश साबळे, प्रवीण कांबळे, दा.गो.काळे, मधुकर वडोदे, माया दामोदर, वा.स.पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रतिष्ठानतर्फे जामनेरचे अशोक कोळी (कथा), वाशिमच्या धम्मज्योती कांबळे (कादंबरी), शहाद्याच्या हेमलता पाटील (गजल), वाशिमचे मोहन शिरसाठ (कविता), चंद्रपूरचे इरफान शेख (विशेष काव्य), माधुरी खांडेकर (काव्याश्री), सुनीता कांबळे (सेवारत्न), माधवी देवळालकर (चारोळीचकोर), ज्योती पाटील (काव्य सखी), कल्याण राऊत (भारूड), श्रीनिवास थेइलवाड (कलारत्न), रमेश सरकाटे (साहित्यभूषण), अरुण विघ्ने (लोककवी), कवी हरदास कोष्टी (जीवनगौरव), रविकांत शार्दूल (अष्टपैलू कवी), शोभा कोठावदे (लोकजागर), भगवान इरतकर (काव्य सखा), लिना देगलूरकर (साहित्य सारथी), जी. एन. ब्राह्मणे (साहित्य सेवा) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यभरातील गजलकारांचा सहभाग
पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन सुवर्णा पावडे (चिखली) या करतील. गजल मुशायर्याचे अध्यक्षस्थान दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे निवृत्त अधिकारी तथा गजलकार शिवाजी जवरे हे भूषवतील. मसूद पटेल, संदीप वाकोडे, विजयालक्ष्मी वानखेडे, छाया सोेेनवणे, हेमलता पाटील, विशाल राजगुरू, एजाज शेख, रमेश सरकाटे सहभागी होतील. सूत्रसंचालन रवी चापके हे करतील.
