भाजपा ही विचारधारा : पक्ष स्थापण्यावेळीही कुणी नेता नव्हता


भाजपा जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे : भुसावळच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश : खडसे समर्थकांची बैठकीकडे पाठ

भुसावळ : काय मिळाले, काय गेले त्याचा विचार करू नये, भाजपा हा विचारांवर चालणारा पक्ष असून उद्या मी पक्षात नसेल तरी पक्ष थांबणार नाही, असा सूचक संकेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे यांनी येथे दिला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षाकडून होणार्‍या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाला रामराम केल्यानंतर जिल्ह्यातील भाजपात भगदाड पडणार, अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्‍वभूमीवर भुसावळसह विभागात गुरुवारी भाजपा पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत डॅमेज कंट्रोज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळातील लोणारी समाज मंगल कार्यालयात भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक झाली. जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांचा इतिहास सांगत त्यांनी केवळ भाजपा हा लोकशाही पक्ष असल्याचे सांगितले. अर्जुन व कर्णाच्या दातृत्वाची कथाही त्यांनी सांगत खासदार आपल्यासोबत असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना आश्‍वस्त करीत पक्ष स्थापण्यावेळीही कुणी नेता नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणीक, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, बेटी बचावो बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, सरचिटणीस विजय धांडे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शैलजा शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.

नगराध्यक्षांसह खडसे समर्थक गैरहजर
भाजपच्या मेळाव्यात माजी मंत्री एकनाथ खडसेंचे समर्थक असलेला एक गट अनुपस्थित होता. यात प्रामुख्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, भाजपा गटनेता मुन्ना तेली, माजी शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, अमोल इंगळे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, किरण कोलते, मुकेश पाटील, शफी पहेलवान, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, वसंत पाटील आदींसह अन्य पदाधिकारी अनुपस्थित होते.

कोरोना योद्ध्यांचा सत्कार
याप्रसंगी कोरोनाच्या कटू काळात जनसेवेसाठी अहोरात्र झटणार्‍या नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी व नगरसेवक युवराज लोणारी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काहींनी भाजपात प्रवेश केला.

कार्यकर्त्यांनी केला खडसेंचा गजर
मान्यवरांच्या भाषणानंतर स्वीकृत नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी माजी मंत्री खडसेंचा नामोल्लेख करीत ते म्हणाले की, ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे खडसे हे उभे राहत होते अगदी त्याचप्रमाणे पक्षाने कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहण्याची अपेक्षा केली तर एका कार्यकर्त्याने निष्ठावंत आता भाजपात नसल्याने भाजपाची कार्यकारीणी बरखास्तीची मागणी केली. शेतकी संघ संचालक प्रशांत निकम यांनी 40 वर्ष भाजपा पक्ष वाढीसाठी झटणार्‍या खडसेंचा साधा नामोल्लेख न झाल्याने संताप व्यक्त करीत भटजी-शेटजींचा पक्ष वाढवणार्‍या खडसेंना पक्षाने आता मानाचे स्थान देवून त्यांचे पक्षात पुन्हा पुर्नवसन करण्याची मागणी करीत कटप्पाने बाहुबली को क्यो मारा? असा प्रश्‍न उपस्थित करताच मोठी खळबळ उडाली. युपीमध्ये वाल्मिक समाजाच्या तरुणीवर अत्याचार झाला, या प्रकरणी पक्षाची भूमिका काय? असा मुद्दा राजू खरारे यांनी मांडला.

निष्ठावंतांचे शक्तीप्रदर्शन तर उपस्थित न राहण्यासाठीही दबाव
संघटन मेळाव्यासाठी लोणारी हॉल गर्दीने खचाखच भरला होता. शहरासह वरणगाव व तालुक्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. खडसे गटाकडून नगरसेवक व भाजपच्या पदाधिकार्‍यांना फोन करून मेळाव्याला जाऊ नका, असे निरोप देण्यात आले. तर भाजपकडूनही पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना उपस्थितीबाबत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे निरोप देण्यात आले. खडसे समर्थक काही पदाधिकारी पक्षातील पदे वाचवण्यासाठी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !