भाजपात न राहणार्यांनी द्यावेत राजीनामे : जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे
भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पक्ष प्रवेशावेळी भुसावळातून अनेक भाजपाप्रेमी तथा खडसे समर्थक मुंबईत ठाण मांडून होते शिवाय त्यांचे सोशल मिडीयावर फोटोही व्हायरल झाले होते त्यामुळे तेच लोक गुरुवारच्या भाजपाच्या बैठकीलाही अनुपस्थित राहिले. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ज्यांना खरोखर आता भाजपात रहावयाचे नाही. त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे कारण हा पक्ष विचारधारेवर चालणारा आहे. जे आजच्या बैठकीला आले नाहीत, त्यांना खुलासा नक्कीच विचारण्यात येईल, ज्यांना भाजपात यावयाचे नाहीत त्यांनी खुशाल नाजीनामे द्यावेत, असेही ते म्हणाले.
नाथाभाऊंवर अन्याय झाला का?
40 वर्ष पक्ष वाढवण्यासाठी खडसेंनी खस्ता खाल्या, अशा नेत्यांवर अन्याय झाला का? या प्रश्नावर जिल्हाध्यक्षांनी गोलमाल उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यांच्याबाबत जे घडले अर्थात ते आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडले मात्र खडसेंवर अन्याय झाला याबाबत बोलताना ते काहीसे कचरल्याचे दिसून आले. भाऊ गेले हे दुर्दैव असल्याचे सांगून ते म्हणाले की, साधा कार्यकर्ता गेला तरी दुःख होते मात्र खडसे हे आमचे नेते होते, त्यांच्याविषयी अधिक बोलणे मी योग्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. खडसे गेल्यानंतर डॅमेज कंट्रोल कसे करणार ? या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपा हा सेवेसाठी काम करणारा पक्ष आहे, आम्ही कामच करत राहणार असल्याचे मोघम उत्तर त्यांनी देत अधिक बोलणे टाळले.

