महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘मेरी सहेली उपक्रम’


मध्य रेल्वेने केली उपक्रमाची सुरूवात : स्थानकासह प्रवासात व गंतव्य स्थानकावरही सुरक्षा

भुसावळ : महिला प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व आरामदायक होण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे ‘मेरी सहेली’ उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. महिला प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षा पुरविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) विशेष सहकार्य करणार असून हा उपक्रम रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू करण्यात आला आहे. नावाप्रमाणेच ‘मेरी सहेली’ ही महिला प्रवाशांची सतत सोबती/मित्र म्हणून काम करणार असून महिलांची सुरक्षा केवळ सुरुवातीच्या स्थानकांतच नव्हे तर मार्गावरील स्थानकांवर, ट्रेनमध्ये आणि गंतव्य स्थानकांवर देखील करणार आहे.

महिला कर्मचार्‍यांची विशेष टीम
महिलांच्या सुरक्षेसाठी महिला अधिकारी आणि कर्मचार्‍यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम महिला प्रवाशांसह सर्व प्रवासी डब्यांना भेट देईल आणि ट्रेनमध्ये प्रवास करणर्‍या महिला प्रवाशांची ओळख पटवेल. महिला प्रवाशांशी संवाद साधताना हे पथक आरपीएफ सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 182, जीआरपी हेल्पलाईन क्रमांक 1512 आणि इतर सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी अद्ययावत करेल तसेच अपरीचीत लोकांकडून खाण्यायोग्य वस्तू स्वीकारू नयेत, फक्त अधिकृत आयआरसीटीसी स्टॉल्समधूनच अन्न खरेदी करण्याबाबत घ्यावयाची खबरदारी व सल्ले महिलांना प्रवाशांना देईल.

चांगल्या प्रवाशाचा येणार अनूभव
महिला प्रवाशाचे नाव, पीएनआर/तिकिट क्रमांक, कोच आणि बर्थ क्रमांक इत्यादी प्रवाशांचा तपशीलदेखील मेरी सहेली टीम नोंदवणार आहे. हे तपशील मूळ स्थानक ते गंतव्य स्थानकापर्यंतच्या मार्गावरील इतर क्षेत्रांत/विभागांमध्ये सामायीक केले जातील. थांबलेल्या स्थानकांवर तैनात केलेली मेरी सहेली टीम महिला प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याबद्दल विचारपूस करणार आहे. अधिक चांगली सेवा देण्यासाठी पावले उचलण्यासाठी प्रवासाचा अनुभव अभिप्राय गंतव्यस्थानावर घेतला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात 24 गाड्यांमध्ये उपक्रम
मध्य रेल्वेच्या आरपीएफने 24 विशेष गाड्यांमध्ये मेरी सहेली कार्यक्रम सुरू केला असून यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यात मुंबई-नागपूर-मुंबई दुरांतोे एक्सप्रेस, गोदान एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विशेष , मुंबई-हावडा एक्सप्रेस, पुणे-पाटणा विशेष अशा इतर गाड्यांचा समावेश आहे. महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करण्यामध्ये मध्य रेल्वे नेहमीच अग्रणी राहिली आहे. महिला प्रवाशांची संरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या समर्पित प्रयत्नांचा ‘मेरी सहेली’ आणखी एक महत्त्वाचा भाग असेल.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !