धुळ्यात पोलिस निरीक्षकाचे घर फोडले : सहा लाखांचा ऐवज लंपास


धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : चोरट्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू

धुळे : आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद अशोक कोकरे यांच्या बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत तब्बल सहा लाखांचे दागिने लांबवल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात कोकरे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सर्वसामान्य नागरीकांकडे चोर्‍या-घरफोड्या होत असताना चोरट्यांनी थेट पोलिस अधिकार्‍यांच्या घरातच चोरी करून पोलिस दलाला एकप्रकारे आव्हान दिल्याने याची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

घर बंद असल्याची साधली संधी
निरीक्षक कोकरे फॉरेस्ट कार्यालयासमोरील पोलिस ऑफीस कॉर्टरमध्ये राहतात. 7 नोव्हेंबर रोजी खाजगी कामानिमित्त ते कुटुंबासह पुणे येथे गेल्याने घराला कुलूप लावण्यात आले होते. चोरट्यांनी संधी साधत 7 ते 8 नोव्हेंबरदरम्यान घराचे कुलूप तोडून पाच लाख 98 हजार 750 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले. 8 रोजी कोकरे हे परीवारासह घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेले आढळले तर घरातच सामान अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी लोखंडी कपाटाचे लॉकर तपासल्यानंतर त्यातून दागिण्यांची चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी धुळे शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा लाखांच्या ऐवजावर डल्ला
कोकरे यांच्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी दिड लाख रुपये किंमतीची सोन्याची मोहनमाळ, सव्वा लाख रुपये किंमतीचा नेकलेस, 50 हजार रुपये किंमतीच्या दोन तोळे वजनाच्या बांगड्या, 45 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 15 हजार रुपये किंमतीची चैन, 12 हजार 500 रुपये किंमतीचे ओम पेंडल, आठ हजार 750 रुपये किंमतीचे कानातील रींगा, 17 हजार 500 रुपये किंमतीचे कानातील झुमके, 12 हजार 500 रुपये किंमतीचे कानातील झुमके, अडीच हजार रुपये किंमतीचे सोन्याची नथ, साडेसात हजर रुपये किंमतीचे लेडीज अंगठी, 40 हजार रुपये किंमतीचा चांदीचा छल्ला चोरट्यांनी लांबवला. तपास शहरचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !