धुळ्यात दोन बँकांचे एटीएम फोडले : रोकड मात्र सुरक्षित
चोरटे शिरजोर : वाढत्या चोर्यांमुळे नागरीक भयभीत
धुळे : शहरात चोर्या-घरफोड्यांच्या उच्छादानंतर थेट पोलिस निरीक्षकाचे घर फोडल्याची घटना ताजी असताना बुधवारी पहाटे शहरातील दोन बँकांचे एटीएम फोडून रक्कम लांबवण्याचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने रोकड सुरक्षित राहिली. या घटनांमुळे मात्र नागरीकांमध्ये भीती पसरली आहे.
एकाच वेळी दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न
सूत्रांच्या माहितीनुसार, धुळे शहरातील पंचवटी चौकातील अॅक्सीस बँकेचे एटीएम चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न केला मात्र कॅश ट्रे पर्यंत पोहोचता न आल्याने रोकड सुरक्षित राहिली. घटनेची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, देवपूर सहा.निरीक्षक चंद्रकांत पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत आदींनी धाव घेत माहिती जाणून घेतली. दुसर्या घटनेत चितोड रोडवरील क्रांती चौकातील स्वामी कॉम्प्लेक्समधील टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र येथेदेखील कॅश सुरक्षित राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक प्रदीप पाडवी, शहरचे निरीक्षक नितीन देशमुख व सहकार्यांनी धाव घेतली. यावेळी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी चोरीपूर्वी एटीएमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे नुकसान केले तसेच दोन्ही घटनेतील चोरटे एकच असल्याची शक्यता असून चएटीएम फोडण्यासाठी वाहनाचा वापर झाला असल्याची दाट शक्यता आहे.


