कत्तलीपूर्वीच टहाकळीत 30 गुरांची सुटका


ग्रामस्थांची सतर्कता : नादुरुस्त ट्रक सोडून चालक पसार

भुसावळ : तालुक्यातील टहाकळी जिल्हा परीषद शाळेच्या आडोशाला नादुरुस्त ट्रकची दुरुस्ती सुरू असताना या ट्रकमध्ये कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी मिळाल्यानंतर त्यांनी वरणगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर 30 गुरांची सुटका करण्यात आली. पोलिस व जमावाला पाहताच ट्रक चालकाने मात्र धूम ठोकली. गुरांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची जळगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली.

जमावाला पाहताच चालक पसार
टहाकळी येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ नादुरुस्त ट्रक (एम.एच.18 ए.ए.9515) मध्ये गुरे असल्याची माहिती ग्रामस्थांना कळाल्यानंतर त्यांनी वरणगाव पोलिसांना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कळवले. या वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पीएसआय कैलास आकुले, हवालदार नागेंद्र तायडे, अतुल बोदडे, होमगार्ड गणेश भोई, राजेंद्र फालक यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर निर्दयतेने गुरांची वाहतूक होत असल्याचे आढळले. यावेळी 13 गुरांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उर्वरीत 30 गुरांवर प्राथमिक उपचार करून त्यांना जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले. चार लाख रुपये किंमतीची गुरे व 15 लाख रुपये किंमतीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला. या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला. हवालदार नागेंद्र तायडे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.