लाचखोर सहाय्यक अधीक्षकासह कनिष्ठ लिपिकाची कोठडीत रवानगी


डॉक्टरांकडेच मागितली होती 65 हजारांची लाच

धुळे : शासकीय सेवेतील डॉक्टरांचा सातव्या वेतन आयोगाचा फरक मंजूर करून देण्यासाठी एकूण रकमेच्या 10 टक्के रक्कम अर्थात 65 हजार रुपये लाच स्वरूपात स्वीकारताना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक व कनिष्ठ लिपिक यांना अधीक्षकांच्या कक्षातच धुळे एसीबीच्या पथकाने बुधवार, 4 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पकडल्यानंतर आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली होती. अटकेतील आरोपींना गुरूवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सहकारी डॉक्टरांकडेच मागितली लाच
शासकीय सेवेत डॉक्टर असलेल्या तक्रारदाराकडे संशयीत आरोपी सहाय्यक अधीक्षक गोपाळ पितांबर राणे (51, प्लॉट न.43/1/2, स्व.प्रल्हाद तात्या नगर, करवंद रोड, शिरपूर) व कनिष्ठ लिपिक गणेश शाम माळवे (38, रा.प्लॉट नंबर 35, गजानन कॉलनी, करवंद नाका, शिरपूर जि.धुळे) यांनी 22 ऑगस्ट रोजी लाच मागितली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर 4 सप्टेंबर रोजी लाच घेण्याचे ठरल्यानंतर सापळा लावण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे धुळे उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात सापळा यशस्वी करण्यात आला.

सकाळपासून पथक बसले ताटकळत
दोघा आरोपींनी सुरुवातीला बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास लाच स्वीकारू, असे सांगितल्याने एसीबीचे पथक सापळा लावून तयार होते मात्र आरोपींनी अचानक आपला प्लॅन बदलत दिवसभराचे संपूर्ण काम आटोपले व दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जेवणाच्या सुटीत तक्रारदाराकडून लाच मागितली. यावेळी पंचांनी इशारा करताच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सकाळी 11 ते 2.30 वाजेपर्यंत सापळा यशस्वीतेसाठी एसीबीचे पथकही ताटकळत थांबून होते.


कॉपी करू नका.