शेणपूर शिवारातील बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त : 27 लाखांचा मुद्देमाल जप्त
12 आरोपींना अटक : लाखोंच्या स्पिरीटसह देशी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त
साक्री : तालुक्यातील शेणपूर शिवारात अवैधरीत्या बनावट देशी दारूचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून तब्बल 12 संशयीतांना अटक केली आहे तर घटनास्थळावरून 26 लाख 59 हजार 954 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे.
गोपनीय माहितीवरून आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीपप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. शेणपूर शिवारातील डोंगर टेकडी परीसरातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दुर्वेश भालचंद्र अहिरराव (रा.धाडणे) हा आपल्या साथीदारांसह अवैधरीरत्या विना परवाना रसायने वापरून बनावट दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून बनावट रसायन, स्पिरीट, देशीदारु तयार करण्याचे साधने जप्त करण्यात आली.


