शिरपूर तालुक्यात 12 लाखांचा ओला गांजा जप्त
605 किलो वजनाच्या झाडांसह 163 किलो सुका गांजा जप्त
शिरपूर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तालुका शहर ग्रामीण पोलिसांनी आदिवासी पट्ट्यात गांजाची शेती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धडक कारवायांना सुरूवात केली आहे. गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी पोलिस, महसूल, वनविभाग यांनी एकत्रीत पथक तयार करून तालुक्यात गांजा शेती शोध मोहहम राबविली. या शोध मोहिमेत या मोहिमेत 605 किलो वजनाची लागवड केलेली झाडे व 163 वजनाचा सुका गांजा असे 768 किलो वजनाचा गांजा जप्त केला.
यांनी राबवली शोध मोहिम
ही शोध मोहीम शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन, सहा.वनरक्षक अमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शिरपूर तालुका पोलीस ठाण्यातील सहा.निरीक्षक अभिषेक पाटील, थाळनेरचे सपोनि सचिन साळुंके यांच्यासह 10 पोलीस अधिकारी, 65 पोलीस कर्मचारी, तीन नायब तहसिलदार, 13 मंडल अधिकारी व तलाठी, सांगवी वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी मेश्राम, त्यांचे 10 वनपाल व वनरक्षक यांनी राबवली.

शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल
या जम्बो कार्यवाहीत चिलारे व लाकड्या हनुमा शिवारात रतनसिंग पाडवी याच्या शेतातून तब्बल 12 लाख 10 हजार रुपये किमतीची 605 किलो वजनाच्या ओल्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली. तर राहुजा नाना पाडवी याच्या शेतात वाळत ठेवलेला 8 लाख 15 हजार रुपये किमतीचा 163 किलो वजनाचा सुका गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परीसरात कार्यवाही होत असताना संबंधित शेतकरी व शेतात काम करणारे मजूर घटनास्थळावरून पसार झाले.

