‘मराठा समाज आरक्षणासाठी महाराष्ट्रभर नेतृत्व करणार’
खासदार उदयनराजे भोसले : आरक्षण देणार नसेल तर राजीनामा द्या
सातारा : जाती-जातीत तेढ करु नका, आरक्षण देणार नसेल तर राजीनामा द्या, असा हल्लोबोल करून खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यांना नावं ठेवली. आता सत्तांतर झालंय. तुम्ही का आरक्षणाचं काम केलं नाही. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी वकिलाला हजर होऊ दिलं नाही. त्यांना गायब केलं. मराठा समाजाला किरकोळीत काढण्याचाच हा प्रकार आहे. एखादा निर्णय घ्यायला गेलो तर हाणून पाडला जातो. दबाव टाकला जातो, असा हल्लाबोल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रभर नेतृत्व करावं लागणार असल्याचे त्यांनी सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परीषदेत सांगितले. पपरीषदेत उदयनराजेंचा सर्व रोख हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच दिसून आला मात्र त्यांनी स्पष्टपणे नाव घेतले नाही.
फडणवीसांना सत्ता द्या, आरक्षण प्रश्न सोडवतो
फडणवीस यांनी जात पाहिली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा सत्ता द्या, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो, ती जबाबदार माझी’ असेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेपूर्वी बोलताना उदयनराजेंनी अनेक बाबींवर मत स्पष्ट केले. मराठा समाजाला डावललं जातंय. स्वत: करायचे नाही मात्र, दुसर्यावर खापर फोडायंच काम सुरू आहे. कारण, त्यावेळी सर्व काही शक्य होतं. त्यांनी का केलं नाही, असा सवालही उदयनराजेंनी केला. तसेच शासनाने परीक्षा घेताना मराठा समाजाच्या जागा बाजुला ठेवून घ्याव्यात, असेही स्पष्टपणे सांगितले.


