यावल पालिका उपनगराध्यक्षपदी रुख्माबाई भालेराव यांची निवड
यावल : यावल नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी रुख्माबाई भालेराव (महाजन) गुरुवारी झालेल्या सभेत ऑनलाईन निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांनी आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रीक्त पदावर सत्ताधारी गटाच्या नगरसेविका रुख्माबाई नथ्थु भालेराव (महाजन) यांची वर्णी लागली. यावल तहसीलदार तथा निवडणूक निर्णय आधिकारी महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बबन तडवी यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. गुरुवारी यावल नगरपरीषदेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता झालेल्या निवड प्रक्रियेत 19 नगरसेवकांनी आपला सहभाग नोंदविला. रुख्माबाई भालेराव यांना 11 तर प्रतिस्पर्धी शेख सैदाबी हरून या आठ मते पडल्याने त्यांचा पराभव झाला.
उपनगराध्यक्षांचे निवडीनंतर स्वागत
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सत्ताधारी गटाकडून नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी, माजी नगराध्यक्ष व नगरपरीषदेचे गटनेते अतुल वसंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.मुकेश पोपटराव येवले, माजी उपनगराध्यक्ष राकेश मुरलिधर कोलते, नगरसेवक असलम शेख नबी, नगरसेविका देवयानी धीरज महाजन, शिला श्रीधर सोनवणे, कल्पना दिलीप वाणी, रेखा युवराज चौधरी यांची उपस्थिती होती. उपस्थित नगरसेवकांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष रुख्माबाई भालेराव यांच्या निवडीचे स्वागत केले.

