निंभोरा स्टेट बँकेतील 115 शेतकरी विमा रकमेपासून वंचित


40 दिवस उलटूनही मंजूर विमा रक्कम मिळेना : शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

निंभोरा : स्टेशन परीसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत केळी पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांपैकी 115 शेतकरी विमा रक्कम मंजूर होऊन 45 दिवस लोटले तरी रकमेपासून वंचित राहिले आहेत. शेतकरी महिनाभरापासून चकरा मारून त्रस्त झाले आहेत मात्र शाखा व्यवस्थापक किंवा कर्मचारी अथवा विमा कंपनीचा कोणीही जबाबदार अधिकारी यासाठी ठोस कारण देत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या कारणावरून बँकेत या शेतकर्‍यांसोबत अधिकार्‍यांची अनेकदा तू तू मै मै होत आहे.

तर शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन
आधीच या बँकेतील कर्मचारी वर्ग इतरत्र बदलून गेल्यानंतर त्या जागेवर पूर्ण क्षमतेने कर्मचारी नसल्याने ग्राहकांना मोठा मानसिक त्रास होत आहे. त्यातच विमा रकमेच्या विलंबामुळे समाधान होत नसल्याने बँकेचे ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. या संबंधी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने बँकेत सहा.व्यवस्थापक निलेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यात 7 डिसेंबर पर्यंत विमा रक्कम खात्यात न पडल्यास शेतकर्‍यांसोबत ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदन देतांना ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, गिरीश नेहेते, खिर्डीचे गिरीश ढाके, डॉ.मुरलीधर पाटील, वाघाडीचे देवराम चौधरी, कांडवेलचे शिवाजी पाटील आदी पीकविमा रक्कम बाकी असलेले शेतकरी उपस्थित होते. स्टेट बँक व्यवस्थापनाने या शाखेकडे लक्ष देऊन चौकशीची मागणी ही शेतकर्‍यांनी केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !