फाजील आत्मविश्वास व अहंमपणामुळेच भाजपाचा पराभव
माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी चालवले फडणवीसांसह चंद्रकांत पाटलांवर टिकेचे बाण
मुक्ताईनगर : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चार जागा तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला शिवाय एका जागेवर महाविकास आघाडीतील फूटीर मतदानामुळे भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले असून फाजील आत्मविश्वास व अहंमपणामुळे झालेला हा पराभव असल्याची टिका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली. महाविकास आघाडीने मिळवलेल्या यशानंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता खडसे म्हणाले की, मी पुन्हा येणार, पुन्हा येणार ही भावना अद्यापही गेलेली नाही शिवाय भाजपावरील विश्वास कमी-कमी होत असून महाविकास आघाडीवरील विश्वास वाढत असल्याचे ते म्हणाले.
हम करे सो कायदा : भाजपात प्रघात
आपल्या आक्रमक शैलीत खडसे म्हणाले की, भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. निवडणुका या कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकता येतात मात्र
भाजपाचे नेतृत्व कमजोर झाले असून हम करे सो कायदा हा प्रघात भाजपात कायम आहे. एका व्यक्तीच्या इशार्यावर पक्ष काम करीत असून उत्तम नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे पक्षाला या निवडणुकीत मिळालेले यश समोर आले आहे. चंद्रकांत पाटील नेहमी म्हणत की, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही. आम्ही हिमालयात जाऊन बसू, त्यांच्या नुसत्या गप्पा असतात, अशा शब्दांत खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकेचा आसूड ओढला आहे.

