धुळ्यात 25 तलवारींसह सहा आरोपींना अटक


चाळीसगाव रोड पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई

धुळे : धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दोघा संशयीताच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून तब्बल 25 तलवारींसह विक्रीसाठी आणलेला चॉपर जप्त केला आहे. शहरातील सार्वजनिक हॉस्पीटल, कपडा बाजार भागात रविवारी सायंकाळी सहा वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शाकीब हुसेन जाकीर हुसेन अन्सारी (शादाब नगर, मायक्रो टॉवरजवळ, धुळे) व अरबाज शमीम शेख (वडजाई रोड, मारोती मंदिरामागे, धुळे) या आरोपींसह तलवारी विकत घेणार्‍या अन्य चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विक्री केलेल्या सहा तलवारी जप्त
दोघा अटकेतील आरोपींनी मालेगाव येथील मुजाहिद व त्याच्या साथीदारांकडून या तलवारी विकत घेतल्याचे सांगत त्या विक्रीसाठी धुळ्यात आणल्याची माहिती दिली तसेच सहा तलवारींची विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर तलवार विकत घेणार्‍या संशयीताकडून सहा तलवारी जप्त करण्यात आल्या. त्यात मो.शादाब मुख्तार अहेमद अन्सारी व जियाउर रहेमान इम्रान अहेमद यांच्या ताब्यातून प्रत्येकी दोन तर तौसीफ अब्बास पिंजारी व अन्सारी अमीर जलील अहेमद यांच्या ताब्यातून प्रत्येकी एक तलवार जप्त करण्यात आली. संबंधिताविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण 23 मोठ्या तर दोन छोट्या आकाराच्या एकूण 25 तलवारी तसेच चॉपर मिळून 38 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक विलास ठाकरे, योगेश राऊत, प्रेमराज पाटील, अजीज शेख, भुरा पाटील, सुशील शेंडे आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !