थोरगव्हाणच्या विवाहितेने मृत्यूला कवटाळले
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात ; यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
यावल- तालुक्यातील थोरगव्हाण येथे माहेरी आलेल्या 29 वर्षीय विवाहितेने काहीतरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. रविवार, 8 सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. प्रमिलाबाई दीपक पाटील (29) असे विवाहितेचे नाव आहे. मृत प्रमिलाबाई यांचे माहेर व सासर थोरगव्हाण असून त्या माहेरी आल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री उशिरा विषारी द्रव प्राशन केले असल्याचा कयास आहे. रविवारी सकाळी विवाहितेचे आई-वडिल तिला उठवण्यासाठी गेल्यानंतर विवाहितेने विष प्राशन केल्याची घटना उघड झाली. पोलिस पाटील गजानन चौधरी यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.एन.डी.महाजन यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मृत विवाहितेच्या पश्चात पती, तीन मुले, आई-वडील असा परीवार आहे.