सहा वर्षीय बालकाची दगडाने ठेचून हत्या
नवी अंतुर्ली येथील दुर्दैवी घटना : पोलिसांकडून मारेकर्यांचा कसून शोध
शिरपूर : तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात एका अज्ञात इसमाकडून गावातील एका सहा वर्षीय बालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना 23 डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली. भरदुपारी एका अज्ञान बालकाची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका व जिल्ह्यातील तपास यंत्रणा रात्री उशिरा दाखल झाल्या. मोहित दिनेश ईशी (6, रा.अंतुर्ली) असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे.
शेतात आढळला बालकाचा मृतदेह
मोहित हा गावातील एका शेतात मजुरीसाठी गेलेल्या आई सोबत गेला होता. अंतुर्ली येथील दिनेश शिवाजी ईशी ज्योती दिनेश ईशी यांचा तो मुलगा आहे कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मोहितला घरी एकटे सोडण्याएवजी आई शेतात सोबत घेऊन गेली होती मुलाला बांधावर बसवल्यानंतर शेतात निंदनी करत असताना आपला मुलगा शेतात दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर सर्वत्र शोध घेत असताना सायंकाळी एका शेतात मुलगा मृत अवस्थेत आढळून आला. अज्ञात इसमाकडून दगडाने ठेचून मारल्याचे निदर्शनात आल्याची वार्ता गाव परिसरात वार्यासारखी पसरली. घटनास्थळी डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय सोनवणे, गुलाब ठाकरे, पोलीस नाईक अनिल शिरसाट,ललित पाटील,ि दनेश माळी, रवींद्र ईशी, सनी सरदार, बापूजी पाटील, अमित जाधव, पाटील, उमेश पाटील, स्वप्नील बांगर आदींनी धाव घेतली.


