महाजनादेश यात्रेच्या स्वागताची भुसावळात जय्यत तयारी


भुसावळात मुख्यमंत्री मुक्कामी नाहीच ; सभा स्थळाची अधिकार्‍यांकडून पाहणी

भुसावळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 7 रोजी जिल्ह्यात प्रवेश करीत असून 8 रोजी भुसावळातील डी.एस.ग्राऊंडवर दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर्स, स्वागत कमानी उभारण्याचे काम वेगात सुरू आहे तर सुमारे सात हजार नागरीक बसू शकतील या पद्धत्तीचा वॉटर प्रुफ मंडप उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. महाजनादेश यात्रेच्या मार्गावर अडसर ठरणार्‍या झाडाच्या फांद्या हटवण्यासह रस्त्यांची डागडूजी करण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागासह पालिका प्रशासनाने भर दिला आहे.

भुसावळऐवजी जामनेरला मुख्यमंत्र्यांचा मुक्काम
सुरुवातीला भुसावळात मुख्यमंत्री मुक्कामी राहणार होते मात्र आता मुख्यमंत्री जामनेरात मुख्यमंत्री मुक्कामी थांबणार असल्याचे वृत्त खात्रीलायक वृत्त आहे. 7 रोजी सायंकाळी विदर्भाची सीमा व खान्देशाची सुरुवात असलेल्या घाणखेड या गावात यात्रेचे आगमन झाल्यानंतर घाणखेड ते बोदवड व तेथून पुढे जामनेरकडे महाजनादेश यात्रा मार्गक्रमण करणार आहे.

जामनेर, भुसावळसह जळगावात सभा
जामनेर येथे मुख्यमंत्र्यांची गुरुवार, 8 रोजी रोजी सकाळी 10 वाजता सभा झाल्यानंतर भुसावळात दुपारी 12 वाजता डी.एस.ग्राऊंडवर सभा होईल व त्यानंतर मुख्यमंत्री एक वाजता जळगावातील सागर पार्कवर सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री जिल्ह्यात येत असल्याने पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.