भुसावळात 44 उपद्रवी गणेशोत्सवात शहराबाहेर
श्री विसर्जन दिनी भुसावळ बसस्थानकाचे स्थलांतर : मिरवणुकीवर ड्रोन कॅमेर्याची राहणार नजर
भुसावळ : सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील 44 उपद्रवींना 10 ते 13 सप्टेंबरदरम्यान शहरातून हद्दपार करण्यात आले आहे तर दुसरीकडे सोमवारी पोलिस प्रशासन व नगरपालिकेच्या अधिकार्यांनी श्री विसर्जन मार्गाची पाहणी करीत उपाययोजनांव भर दिला आहे. श्री विसर्जन मिरवणूक मार्गावर बॅरीकेटींग लावणे, खाली आलेल्या वीज तारा उंच करणे, प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्यास श्री विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमेरे लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. गुरुवार, 12 रोजी अनंत चतुर्थदशीला गणरायाचे विसर्जन होणार असून या दिवशी बसस्थानकाचे यावल रस्त्यावरील डी.एस.ग्राऊंडवर स्थलांतर करण्यात येईल तर शहरातील प्रमुख वर्दळीच्या मार्गावरही बॅरीकेटींग करून वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे.
44 उपद्रवींना उत्सव काळात शहरबंदी
शहर हद्दीतील 13 तर बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील 31 उपद्रवींना उत्सवाच्या काळात 10 ते 13 दरम्यान शहर बंदी करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी सांगितले. त्या शिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगार, हद्दपार तसेच सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्यांवर पोलिस प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे ते म्हणाले.
मिरवणुकीवर ड्रोन कॅमेर्याची नजर
श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कसोशीने प्रयत्न चालवले आहेत. श्री विसर्जन मिरवणुकीवर दोन ड्रोन कॅमेर्यांची नजर राहणार असून त्या शिवाय व्हिडिओ शुटींगही केले जाणार आहे. सोमवारी विसर्जन मार्गावरील व्यापार्यांना सीसीटीव्हीची दिशा मिरवणूक मार्गावर करण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षकांनी केल्यानंतर व्यापार्यांनी सकारात्मकता दर्शवली शिवाय नव्याने सीसीटीव्ही बसवण्याचे आश्वासनही दिले.
पालिका प्रशासनही करणार उपाययोजना
श्री विसर्जन मार्गावरील खड्डे, उंची मूर्तींना अडथळा न ठरण्यासाठी खाली आलेल्या वीज वाहक तारा, प्रार्थनास्थळाजवळ पोलिसांना लागणारे रेड व ग्रीन लाईट पुरवण्यासह रस्त्यावरील गुलाल उचलण्यासाठी कर्मचार्यांची नेमणूक करण्याबाबत पोलिस प्रशासन व पालिका मुख्याधिकार्यांनी चर्चा केली.
या अधिकार्यांची होती उपस्थिती
श्री विसर्जन मिरवणूक पाहणीसाठी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह पालिका, वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.