चिन्याच्या कुटुंबियांना अधिकार्‍यांकडून धमक्या


जळगाव : कारागृहातील बंदी रवींद्र जगताप उर्फ चिन्या याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तक्रार तसेच न्यायालयात दाखल याचिका मागे घ्यावी यासाठी कारागृहाचे अधिकारी राजकीय व इतर क्षेत्रातील व्यक्तीमार्फत आमिषे दाखवत असून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार चिन्याची पत्नी मीनाबाई जगताप यांनी सोमवारी पोलिस अधीक्षक व औरंगाबाद खंडपीठाकडे केली आहे.

तक्रारी करूनही न्याय नाहीच
मीना जगताप यांनी तक्कारीत नमूद केले आहे की, कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक पेट्रेस जोसेफ गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, आण्णा काकड, अरविंद पाटील व दत्ता खोत यांनी चिन्याला कारागृहात बेदम मारहाण केली होती व त्यात त्याचा 11 सप्टेबर 2020 रोजी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याबाबत शासन तसेच कारागृह प्रशासनाकडे तक्रारी करुनही न्याय मिळत नसल्याने न्यायासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका (क्र.3938य20) 22 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे. ही याचिका दाखल होताच वरील दोषींनी कारागृहातील काही व्यक्ती, राजकीय व्यक्तींना हाताशी धरुन आमिषे दाखविण्याचा प्रयत्न करतानाच धमक्याही दिल्या जात असल्याचे मीना जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे. माझ्या कुटुंबियांना काही धोका झालाच तर त्यास संबंधित व्यक्तीच जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !