यावल पालिकेत पाच महिन्यांपासून सर्वसाधारण सभेला ‘खो’
जिल्हाधिकार्यांकडे अहवाल सादर करण्याची यावल पालिकेतील विरोधी गटाची मुख्याधिकार्यांकडे मागणी
यावल- यावल पालिकेतील नगराध्यक्षा सुरेखा कोळी तब्बल पाच महिन्यांपासून सभा न घेतल्याने मुख्याधिकार्यांनी कलम 81 (1 अ)नुसार जिल्हाधिकार्यांकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी विरोधी गटातील नगरसेवक अतुल पाटील व सहकार्यांनी सोमवारी मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावल पालिकेत शिवसेनेच्या सुरेखा कोळी लोकनियुक्त नगराध्यक्षा आहेत. राज्यात कुठेही युती नसताना यावल येथे सेना-भाजप युती होती. नंतर सत्तेत आल्यावर सेनेसोबत काँग्रेस सत्तेत असून अपक्ष (भाजप समर्थक) नगरसेवक मात्र विरोधी बाकावर आहेत. यामुळे दोन्ही गटात नेहमी कलगीतुरा रंगतो. आता नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी पाच महिन्यांपासून सभा न घेतल्याचे कारण पुढे करत सोमवारी विरोधी गटातील नगरसेवक अतुल पाटील, रुख्माबाई भालेराव-महाजन, नौशाद तडवी, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, पौर्णिमा पालक, देवयानी महाजन यांनी मुख्याधिकार्यांना निवेदन दिले. त्यात नगर परिषद अधिनियम 1965 च्या कलम 81 आणि महाराष्ट्र नगरपरिषद (सभा कामकाज) नियम 1966 मध्ये सभा चालवण्यासंबंधी तरतूद आहे. त्यानुसार अध्यक्षांनी दर दोन महिन्यांनी सर्वसाधारण सभा कलम 81 (1) अन्वय बोलावणे बंधनकारक असतानाही नगराध्यक्षा कोळी यांनी सभा घेतली नाही. त्यामुळे मुख्याधिकार्यांनी तसा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सादर करावा. सभा होत नसल्याने शहरातील कामे ठप्प झाल्याचा आरोपही विरोधी गटाचा आहे.
हद्दवाढीनंतरचा प्रस्ताव पडून
शहरातील हद्दवाढीला मंजुरी मिळाली यानंतर त्या भागातील विकासकामांचे प्रस्ताव पालिकेने ग्रामविकास विभागाकडे पाठवणे आवश्यक आहे. ते प्रस्ताव अद्याप पाठवलेले नाहीत. सभा मुदतीत होत नसल्याने ही कामे रखडल्याचा आरोप होत आहे.