शिरपुरात नायलॉन मांजा जप्त : दोघा विक्रेत्यांवर गुन्हा
शिरपूर : महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणार्या दुकानदारांवर शिरपूर शहरात पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दोन ठिकाणी कार्यवाही करीत 4 हजार 360 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास बंदी केलेल्या नायलॉन मांजा दुकानदारांवर शहरात कार्यवाही करण्यात आली.
दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हा
शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील खालचे गाव बालाजी मंदिर परीसरात असलेल्या दोन किराणा दुकानात छापा टाकून चार हजार 360 रुपये किंमतीचा नायलॉन मांजा ताब्यात घेत दुकानदारांविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोन जणाना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधीक्षक डॉ.प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे हवालदार उमेश पाटील, योगेश कोळी, बापूजी पाटील, नरेंद्र शिंदे, स्वप्निल बांगर, अमित रणमळे, प्रवीण गोसावी, पंकज पाटील यांनी केली.


