भुसावळात मातम मिरवणुकीने वेधले लक्ष
भुसावळ : शहरातील इराणी बांधवांतर्फे इमाम हसन हुसेन यांच्या बलिदान दिनानिमित्त (मोहर्रम) विविध भागातून मातम मंगळवारी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी इराणी बांधवांनी मिरवणुकीत शोकही प्रकट केला. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाल्याने मातम मिरवणूक काढण्यात आली.
पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त
शहरातील इमामवाडा भागातून मंगळवारी सकाळी 10 वाजता मातम मिरवणुकीला सुरुवात झाली. मोहम्मद अली रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडर्न रोड, गांधी चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे, साने गुरूजी चौक, हंबर्डीकर चौक, यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळा व तेथून तापी नदीवर मातम मिरवणूक दुपारी आल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व पोलिस कर्मचार्यांनी कडेकोट बंदोबस्त राखला.