कंडारी यात्रोत्सव रद्द : भाविकांना कपिलेश्‍वर महादेवाचे दर्शन घेता येणार


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव रद्द : स्थानिक प्रशासनाचा निर्णय : पुरोहितांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे मकरसंक्रांतीच्या पर्वावर होणारा श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचा प्राचीन काळापासून सुरु असलेला यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यंदा यात्रा न भरविता केवळ कपिलेश्वर महादेवाचा अभिषेक करून, मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. बुधवारी पहाटे पुरोहितांच्या हस्ते वैदिक मंत्रोचारात अभिषेक करून यात्रोत्सव पर्वास प्रारंभ झाला.

यात्रोत्सवाला 500 वर्षांची परंपरा
कंडारी येथे सुमारे 500 वर्षापासून असलेल्या कपिलेश्वर महादेवाच्या यात्रोत्सव परंपरेची एक आख्यायीका आहे. आजतागायत येथील ग्रामस्थांनी ती जपली आहे मात्र यंदा कोरोनामुळे यंदा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. धार्मिक विधी मात्र करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे त्यामुळे यात्रोत्सवाच्या दिवशी पहाटे कपिलेश्वर महादेवाचा अभिषेक व गावातून विविध समाजातर्फे दिली जाणारी मानाची पूजा मात्र कोरोनाचे नियम पाळून शांततेत केल्या जाणार आहे. पूजा विधी करताना पाळावयाचे नियम याची संपूर्ण जबाबदारी मंदिर ट्रस्टकडे सोपवण्यात आली आहे. बुधवारी पहाटे हिरासिंग चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक महादेवाचा अभिषेक करण्यात आला, शरद सोहळे यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष गोकुळ मोरे, सदस्य मुरलीधर जेठवे, हर्षल नारखेडे, सुनील मोरे, पोलिस पाटील रामा तायडे, ग्रामस्थ म्हणून प्रभाकर महाजन, हरसिंग चौधरी, डिगंबर चौधरी, संजय झोपे, सुनील पेंटर, काशीनाथ गोसावी, वैभव सरोदे, चावदास मोरे उपस्थित होते.


कपिल मुनींनी केली तपश्चर्या
तापी नदी काठावर वसलेल्या कंडारी गावाला धार्मिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. महर्षी कपिल मुनींनी या ठिकाणी तपश्‍चर्या केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये मिळतो. कपिल मुनी यांनी या ठिकाणी राहून त्यांच्या आईला उपदेश दिला. कपिल मुनी यांच्या नावावरून या मंदिराचे नाव कपिलेश्वर महादेव मंदिर असे पडले आहे. या गावाचे नाव पूर्वी कर्दनी असे होते. या नावाचा अपभ्रंश होऊन कंडारी या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी मकरसंक्रांतीच्या पर्वावर यात्रोत्सव भरविण्यात येतो. मकर संक्रांतीच्या पर्वावर गंगासागर नंतर येथे कपिलेश्वर महादेवाचा यात्रोत्सव असतो त्यामुळे या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हाभरातील भाविक या ठिकाणी कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येतात. तापी नदीपात्रात पहाटे मंगल स्नान करून महादेवाचे दर्शन घेतल्याने विशेष पुण्य लाभते, असा भाविकांचा समज आहे.

हेमाडपंथी शिवमंदिर
कपिलेश्वर मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून आतील गाभारा हा पूर्वी तीन ते साडे तीन फूट खोल असा होता. त्या ठिकाणी स्वयंभू अशी वाळूची शिवलिंग आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी येऊन आपले नवस मानतात तसेच मानलेले नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात.

मानाच्या पूजेची परंपरा
संक्रांतीच्या पुण्यकाळात सकाळच्या ब्रह्म मुहूर्तापासूनच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी परीसरातील व बाहेरगावाहून भाविक येत असतात. मंदिरात संक्रांतीनिमित्त गावातील राजपूतवाडा, महाजन वाडा व कोळीवाड्यामधून भाविक मानपूजा घेवून जातात. त्यात प्रामुख्याने ही मानाची पूजा पूर्व परंपरेपासून चालत आली आहे. गावातील सर्व देवी, देवता, वीर, मुंजांना व बाण्यांना मानपूजा देण्यासाठी सकाळी आठ वाजता वाड्यातील सर्व सत्पंथी अनुयायी स्त्री, पुरुष, तरुण, वृध्दमंडळी महाजन वाड्यात एकत्रित जमा होऊन येथूनच प्रथम मानाची पूजना देण्यास सुरुवात होते. गावातील विठ्ठल मंदिर, बेहरमबुआ, हनुमान मंदिर, ऐस देव, वाल्मिक मंदिर, सप्तश्रृंगी मंदिर, कपिलेश्वर महादेव येथे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करुन सोबत आणलेली पूजा व भगवा ध्वज चढविला जातो. गावातील नागरीक व भक्तगण यात्रेला येतात. त्रिवेणी संगमावर आंघोळ करून कपिलेश्वराचे दर्शनाने पुण्यफल प्राप्त होते, अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी त्रिपिंडी, कालसर्प पूजा, ग्रहशांती, अभिषेक आदी पूजा व कर्मविधी केल्या जातात.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !