जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारेंचे नाव मतदार यादीतून गायब !
विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून नाव गायब केल्याचा आरोप
भुसावळ : जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांचे मतदार यादीतून नाव गायब झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ डाली आहे. विशेष म्हणजे भुसावळ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार, 15 रोजी निवडणूक होत असून पूर्वसंध्येलाच हा प्रकार उघडकीस आला आहे. सावकारे यांच्या माहितीनुसार, निंभोरा ग्रामपंचायतीसाठीदेखील शुक्रवारी निवडणूक होत असून आपले मतदान तेथे असून गुरुवारी मतदार यादीची पाहणी केली असता त्यात आपले नाव नसल्याचे निदर्शनास आले. यामागे प्रशासनाचा गलथानपणा आहे की विरोधकांनी प्रशासनाला हाताशी घेत माझे नाव गायब केले? असा आरोप पल्लवी सावकारे यांनी केला आहे. अंतिम प्रारूप यादीत आपले नाव असल्याची खात्री आपण केली मात्र याद्या प्रकाशीत करण्यामध्ये जाणूनबुजून नाव गायब करण्यात आल्याचा दावा सावकारे यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
2017 साली जिल्हा परीषद/पंचायत समिती निवडणूक, एप्रिल 2019 मध्ये लोकसभा व ऑक्टोबर 2019 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये मी मतदानाचा हक्क बजावला होता. मी स्वतः जिल्हा परिषद सदस्या असून माझे नाव जर गायब करण्यात आले असेलतर तालुक्यात अशा किती लोकांची नावे मतदारयादीतून वगळली गेली आहेत ? याचा शोध घेऊन निवडणूक आयोगाकडे मी तक्रार करणार आहे. वेळ पडल्यास उच्च न्यायालयात जाऊ, असेही त्या म्हणाल्या.


माहिती घेतो : तहसीलदार
तहसीलदार दीपक धीवरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नाव आहे वा नाही हे आता लागलीच सांगता येणार नाही मात्र प्रारूप यादीत नाव असेल तर नंतरही असायला हवे. या संदर्भात माहिती घेवून चौकशी करतो, असेही ते म्हणाले.
