ओझरखेडा धरणात अखेर पोहोचले पाणी


जलसंपदा मंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश -नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती

भुसावळ : हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी संघटनेचे मुक्ताईनगर तालुका व वरणगाव परीसरातील शेतकरी बांधवानी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे 3 ऑगस्ट रोजी जामनेर भेटीत केली होती. यावेळी हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी संबंधीत विभागाला दिले होते तर नुकतेच ओझरखेडा धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.

250 शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाचे साकडे
वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात हरताळे सरपंच समाधान कार्ले, विकास काळे, नामदेव भड, सुभाष भड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व तळवेल परीसरातील विकास पाटील, उज्वल पाटील, सुरेंद्रसिंग राजपूत, दरबारसिंग पाटील, दीपक वराडे यांच्यासह 250 शेतकर्‍यानी जलसंपदा मंत्र्यांना साकडे घातले होते. नामदार महाजन यांनी मुख्य अभियंता कुलकर्णी यांना भ्रमणध्वनीवरून हातनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. यावेळी मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी मंत्री महाजनांना ओझरखेडा धरणात पाणी सोडायचे असेल तर वीज पंपाचे वीज बिल आपल्या जलसंपदा विभागाला भरावे लागेल व त्याचा भुर्दंड आपल्याला सोसावा लागणार असल्याचे सांगितले होते तर महाजन यांनी शेतकरी हितासाठी दोन कोटी रुपये भुर्दंड जलसंपदा विभागाला भरावा लागला तरी चालेल मात्र माझ्या शेतकर्‍यांच्या शेतात पाणी आले पाहिजे, शेतकरी सुखी असला तर देश सुखी राहिल, अश्या भाषेत जलसंपदा मंत्र्यांनी मुख्य अभियंत्यांना बजावल्याचे नगराध्यक्ष काळे यांनी कळवले आहे.


कॉपी करू नका.