अंतर्नादचा एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम समाजासाठी आदर्शवत


भुसावळ शहरातील अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघ माजी अध्यक्ष पोपटराव पाटील यांचे मत

भुसावळ- अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी होऊन लोकचळवळीचे स्वरुप देणे अपेक्षित आहे. उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, असे उपक्रम निश्चितच पुरक ठरतील. अंतर्नाद प्रतिष्ठान राबवत असलेला ‘एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजासाठी आदर्शवत उपक्रम आहे, असे मत अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघ माजी अध्यक्ष पोपटराव पाटील यांनी येथे नमूद केले.
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात सोमवारी भुसावळ येथील नगरपालिका शाळा क्रमांक पाचमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

वाचन ही जीवन समृद्ध करणारी कला
वाचन ही जीवन समृद्ध करणारी कला आहे. ती विद्यार्थी दशेत आत्मसात करणे सुलभ होते. अंतर्नादने गरज ओळखून जो उपक्रम राबवला आहे, तो पथदर्शी आहे, असे जय गणेश ज्येष्ठ नागरीकसंघ माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे म्हणून जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील, ज्येष्ठ समाजसेवक रघुनाथ आप्पा सोनवणे, ज्येष्ठ समाजसेवक गोपाळ वाणी, मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांची उपस्थिती होती. अंतर्नादचे ज्ञानेश्वर घुले यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ललित धांडे यांनी तर आभार समन्वयक अमितकुमार पाटील यांनी मानले.

50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शिक्षिका माधवी तायडे यांच्यासह प्रभाकर नेहेते, भूषण झोपे, योगेश इंगळे, समाधान जाधव यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या 50 विद्यार्थ्यांना पाट्या, वह्या,पेन्सील, खोडरबर असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

ज्येष्ठांचा सन्मान कायम स्मरणात
समाजात ज्येष्ठांना ओझ समजल जात पण अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे आणि या प्रसंगी ज्येष्ठांच्या हातून साहित्य वाटप करून अंतर्नादने आमचा जो सन्मान केला आहे तो कायमच स्मरणात राहिल, असे ज्येष्ठ समाजसेवक रघुनाथ आप्पा सोनवणे यांनी नमूद केले. गोपाळ वाणी, मुरलीधर पाटील यांनीही विचार व्यक्त केले.


कॉपी करू नका.