भुसावळात ‘श्री’ विसर्जनासाठी प्रशासन सज्ज


उपद्रवींवर पोलिस प्रशासनाची करडी नजर : विसर्जन मार्गावरील पालिकेने खड्डे बुजवले : तापी काठावर पट्टीच्या पोहणार्‍यांचे पथक

भुसावळ- विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. श्री विसर्जन मार्गावरील खड्ड्यांमध्ये बुधवारी सायंकाळी पालिकेकडून मुरूम टाकण्यात आला असलातरी संततधार पावसामुळे तो वाहिल्याने खडतर मार्गातूनच बाप्पांना निरोप द्यावा लागणार असल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. यंदा शहर व बाजारपेठ हद्दीत 188 सार्वजनिक मंडळातर्फे श्रींची स्थापना करण्यात आली असलीतरी मुख्य विसर्जन मिरवणुकीत सुमारे 44 मंडळांचा सहभाग असणार आहे. श्री विसर्जन मार्गावर पालिकेतर्फे मर्क्युरी लावण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यंदादेखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे डीजेवर बंदी कायम असून डीजे लावल्यास तो जप्त होवून कारवाई होणार आहे शिवाय ऑक्टोपॅड व पारंपरीक वाद्ये वाजवण्यास प्रशासनाने परवानगी दिली असलीतरी ध्वनी मर्यादेचे उल्लंषण होवून प्रदूषण झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. यंदा पालिकेने विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही लावले असून पोलिस प्रशासनाने स्वतंत्र व्हिडिओ कॅमेरे तसेच दोन ड्रोन कॅमेरे लावल्याने कुणी उपद्रव केल्यास त्याच्यावर तातडीने कारवाई होणार आहे.

आज बसस्थानकाचे तात्पुरता स्थलांतर
श्री विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळ बसस्थानकाचे आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून स्थलांतर करण्यात येईल शिवाय शिवाय नाहाटा महाविद्यालयापासून शहराकडे येणारा रस्ता जामनेर रोड बंद असेल तसेच वरणगाव नाका ते बसस्थानक रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे शिवाय शहरातील अन्य मधल्या भागातील रस्तेही बॅरीकेटींग करून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

असा आहे पोलिसांचा बंदोबस्त
पोलिस प्रशासनातर्फे श्री विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर, बाजारपेठ, तालुका पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह दुय्यम अधिकारी तसेच एसआरपीएफ व आरसीपी प्लाटून तसेच तीन स्ट्रायकींग फोर्स व भुसावळसह जळगाव मुख्याल, एलसीबीचे सुमारे 200 पोलिस कर्मचारी, 150 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले असून सेक्टर पेट्रोलिंगही केली जाणार आहे.

तापीकाठी पट्टीच्या पोहणार्‍यांची नियुक्ती
पालिकेतर्फे तापी नदी काठावर पट्टीच्या पोहणार्‍या सुमारे 50 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवाय यावल नाक्यावर पोलिस प्रशासनातर्फे बॅरीकेटींग करण्यात आले येणार असून प्रत्येक मंडळांची नोंद तेथे घेतली जाणार आहे. तापी पात्रावर कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तापी पात्रावरही बॅरीकेटींग केले असून उच्च क्षमतेचे दिवे तेथे लावण्यात येणार आहे शिवाय जनरेटरचीही व्यवस्थाही असेल. तापी पुलावरून काही मंडळे पात्रात श्री मूर्ती टाकत असल्याने त्यामुळे मूर्ती दुभंगण्याचे प्रकार होत असल्याने या प्रकारांना यंदा अटकाव घालण्यात येणार आहे.

गुलालाऐवजी फुले उधळावीत -डीवायएसपी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करावी. यंदा डीजेला बंदी कायम असून मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा शिवाय ध्वनी मर्यादा ओलांडल्यास दोषींवर पर्यावरण कायद्याने गुन्हा दाखल करण्यात येईल. उत्सवाचे पावित्र्य राखून शांततेत श्रींचे विसर्जन करावे. कायदा हातात घेणार्‍यांची कदापी गय केली जाणार नाही, असे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले.


कॉपी करू नका.