‘कॉकरोच जनता पार्टी’ ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा पाठिंबा
अण्णा म्हणाले ; नाव अजब मात्र देशातील तरुण या पक्षामागे !
Senior Social Activist Anna Hazare Extends Support to the ‘Cockroach Janata Party’ मुंबई (24 मे 2026) : नाव जरी अजब असले, तरी या पक्षाच्या मागे देशातील तरुण उभा राहिला आहे, हे महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत सोशल मीडियावर अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देऊ पाहणार्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) ला पाठींबा दर्शवला आहे.
उपहासात्मक ऑनलाइन मोहीम
‘कॉकरोच जनता पार्टी’ ही एक उपहासात्मक ऑनलाइन मोहीम आहे. 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांचे खंडपीठ वरिष्ठ वकील दर्जा मिळवण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी करत होते. यावेळी उगख सूर्यकांत म्हणाले, झुरळांसारखे असे तरुण आहेत, ज्यांना या व्यवसायात रोजगार मिळत नाहीये. यापैकी काही मीडिया, काही सोशल मीडिया आणि काही आरटीआय व इतर प्रकारचे कार्यकर्ते बनत आहेत. हे प्रत्येकजणावर हल्ला करायला सुरुवात करतात. त्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही मोहीम सुरू झाली.



अण्णा हजारे म्हणाले, युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती
लोकपाल आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांनी कॉकरोच जनता पार्टीबाबत भाष्य करताना सरकारला मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, झुरळ हे नाव कदाचित योग्य वाटणार नाही, पण या पार्टीचा उद्देश समजून घेणे गरजेचे आहे. नाव काहीही असले तरी देशातील तरुण या पार्टीच्या पाठीशी उभा आहे. युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती असते. जेव्हा या दोन्ही शक्तींचा संगम होतो, तेव्हा सरकारने त्यांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
बंदीनंतर पुन्हा उभारी ; इन्स्टाग्राम खाते परत मिळाले
काही दिवसांत कॉकरोच जनता पार्टीचे ’एक्स’, ’इन्स्टाग्राम’ अकाऊंट आणि त्यानंतर 10 लाख नोंदणी झालेले अधिकृत संकेतस्थळ बंद करण्यात आले होते. यंत्रणांनी दिलेल्या या झटक्यानंतरही सीजेपीने हार मानलेली नाही. संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली की, त्यांनी त्यांचे इन्स्टाग्राम खाते पुन्हा मिळवले असून पक्ष नव्या दमाने कामाला लागला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात
दरम्यान, या आभासी पक्षामुळे चर्चेत आलेले अभिजीत दीपके यांना अज्ञात व्यक्तींकडून धमक्या आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, सिडको वाळूज महानगर-1 येथील त्यांच्या पालकांच्या घरासमोर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी दोन अधिकारी आणि 22 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.







