स्वतःला कमजोर समजू नका, संघर्षावर मात करून जीवन यशस्वी करा

लेखिका मोहिनी नेहेते : भालोद कला व विज्ञान महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन
भालोद- विद्यार्थिनींनी शिक्षण घेत असतांना कर्तव्याला महत्वाचे स्थान दिले पाहिजे. अध्यात्म व ध्यान धारणेतून आपल्याला मानसिक संतुलन साधता येते आणि आपल्यात धाडस निर्माण होते यामुळे आपल्या बुद्धिमत्तेचा विकास होतो. विद्यार्थिनींनी ध्येय प्राप्तीसाठी स्वतःच्या ‘स्व’ ची ओळख करून घेणे आवश्यक आहे. तुम्ही महिला किंवा कन्या आहेत म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. संघर्षावर मात करून आपले जीवन यशस्वी करणार्या अनेक व्यक्तिरेखा आपल्यात होऊन गेल्या आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेऊन आपण वाटचाल करायला हवी, असे आवाहन लेखिका मोहिनी नेहेते (भालोद) यांनी येथे केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग व कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभेचे युवती सभेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अजयकुमार कोल्हे होते. प्रास्ताविक युवती सभा प्रमुख प्रा.डॉ.मीनाक्षी राणे यांनी केले. त्यांनी युवती सभे अंतर्गत आयोजित होणारे विविध कार्यक्रम व त्यांचे उद्देश स्पष्ट केले. अध्यक्ष प्राचार्य डॉ.अजयकुमार कोल्हे यांनी विद्यार्थिनींना आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी महाविद्यालयातील विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थिनी ही सक्षम होण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही दिले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.राकेश चौधरी, प्रा.पी.एम.चौधरी, किशोर चौधरी, महिला पालक प्रतिनिधी नीलीमा जावळे, विद्यार्थिनी सदस्य प्रियंका शिंदे व चंचल नेमाडे तसेच सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या. कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन प्रा. मोहिनी तायडे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.वर्षा नेहेते यांनी मानले.
