धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ : मुलांना डांबल्याची दुसर्या पत्नीची तक्रार
मुंबई : कॅबीनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून आपल्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे (शर्मा) यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मुंडेविरोधात तक्रार केली आहे.
बंगल्यात मुलांना डांबून ठेवल्याची तक्रार
करुणा मुंडे यांनी पोलिसस आयुक्ताकडे दिलेल्या तक्रार अर्जानुसार, पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवले आहे. मला त्यांच्याशी भेटू दिले जात नाही. 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी 30 ते 40 पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. चित्रकूट बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात 14 वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही, असं नमूद करण्यात आलं आहे. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी द्यावी व मुंडे यांच्यावर कठोर करावाई करण्याची विनंतीही करुणा मुंडे यांनी केली आहे.

