धूमस्टाईल महिलेचे मंगळसूत्र लंपास
शिरपूर : शहरातील निमझरी नाक्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी धूमस्टाइलने महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास सांदीपनी कॉलनीत घडली.
मंगळसूत्र ओढताच चोरट्यांचा पोबारा
सांदीपनी कॉलनीत राहनार्या मनीषा पाटील ही महिला एका विवाह समारंभातुन पुतणी छकुली व सेजल यांच्यासह घराजवळ परतत असतांना अज्ञात दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला.मनीषा पाटील यांनी आरडाओरड करण्याच्या आतच चोरटे भरधाव करवंद नाक्याच्या दिशेने पसार झाले. परीसरातील युवकांनी त्यांचा पाठलाग केला असता संशयितांचा तपास लागू शकला नाही. गुन्ह्यानंतर सांदीपनी कॉलनीतून पीपल्स बँकेच्या दिशेने दुचाकीवर पळून जाणार्या चोरट्यांची हालचाल एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याने टिपली आहे. घटनेनंतर दाखल झालेले उपनिरीक्षक किरण बार्हे यांनी चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मनीषा पाटील यांनी शिरपूर शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे शहर पोलिस तपास करीत आहेत.


