भुसावळ तालुक्यात सरपंच निवड 10 ते 18 दरम्यान होणार
भुसावळ : तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता सरपंच निवडीची तारीख जाहीर झाली आहे. तालुक्यातील 26 ग्राम पंचायतींच्या सरपंच निवड ही 10 ते 18 फेब्रुवारी या काळात होणार आहे. गावनिहाय निवडीचा कार्यक्रम गटविकास अधिकारी तयार करीत आहे. या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यामुळे ग्रामीण भागात आता सरपंच निवडीचा राजकीय धुराळा उडणार आहे. गेल्या महिन्यात तालुक्यातील 26 ग्राम पंचायतींच्या सदस्य निवडीसाठी निवडणूका पार पडल्यात. या झालेल्या निवडणूकीनंतर आता सरपंच निवडणूकीकडे राजकीय मंडळींसह गावकर्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांचे निवडणूक घेण्याचे पत्र शुक्रवारी तहसील कार्यालयासह पंचायत समितीला प्राप्त झाले आहे. यामुळे निवडणूक झालेल्या गावांमध्ये आता सरपंच निवड होणार आहे. यामुळे गावा-गावांमध्ये सरपंच निवडीबाबत चर्चा होऊ लागली आहे.
गावनिहाय निवडीचा कार्यक्रम
तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीसाठी पंचायत समितीतर्फे कार्यक्रम तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कुठल्या गावात कधी निवड होणार याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवारी ही प्रक्रीया पूर्ण होण्याची शक्यता गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी सांगितले. सरपंच निवड ही त्या-त्या गावातील ग्राम पंचायतींच्या सभागृहात होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणन ग्रामसेवक असतील.



