जळगाव शहर पोलिसांची कामगिरी : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पाच तासात अटक
12 हजारांची रोकड हस्तगत : संशयीत गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी
जळगाव (मंगळवार, 1 सप्टेंबर 2026) : जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या पाच तासांत उघडकीस आणत दोन संशयितांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 12 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली.
काय आहे प्रकरण ?
जळगाव शाहूनगर परिसरातील शाह कॉम्प्लेक्स भागात तक्रारदार व व्यवसायाने मॅनेजर असलेल्या अनिल राजमल कासट (62) यांच्या पँटच्या खिशातून चोरट्यांनी 12 हजार 500 रुपयांची रोकड लांबवली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी निरीक्षक सागर शिंपी यांनी तपासाचे निर्देश दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गुन्ह्यातील संशयीत गेंदालाल मिल परिसरातील असल्याची माहिती मिळताच संशयीतांना ताब्यात घेण्यात आले.

दोन आरोपींना अटक
संशयीत शहीदखान नजीरखान (27, युसूफ मेडिकलजवळ, जळगाव) व समीर खान मजीद खान (37, गेंदालाल मिल, जळगाव) यांना गेंदालाल मिल परिसरातील एका दुकानाजवळून ताब्यात घेण्यात आले तर एका गुन्ह्यात एका अल्पवयीनाचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
यांचा शोध घेण्यात आला. संशयीताकडून 12 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गन्नापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखालील ग्रेडेड उपनिरीक्षक सुनील पाटील, एएसआय दीपक शिरसाट, हवालदार नंदलाल पाटील, हवालदार भगवान पाटील, हवालदार उमेश भांडारकर, हवालदार सतीश पाटील, हवालदार विरेंद्र शिंदे, हवालदार योगेश शिंदे, कॉन्स्टेबल अमोल ठाकूर, कॉन्स्टेबल राहुलकुमार पांचाळ, कॉन्स्टेबल प्रणय पवार, कॉन्स्टेबल भगवान मोरे आदींच्या पथकाने केली.


