पुणे ते नागपूर दरम्यान त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी धावणार
भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुणे ते नागपूर दरम्यान त्रि साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 02035 त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष पुणे येथून 7 फेबु्रवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी 5.40 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी नागपूरला 9.10 वाजता पोहोचणार आहे. 02036 त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी नागपूर येथून 6 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सहा वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पुण्याला 9.05 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जंक्शन, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, सहा वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 11 शयनयान आणि 4 द्वितीय श्रेणी आसन बोगी जोडण्यात येणार आहेत.
5 फेब्रुवारीपासून आरक्षण सुविधा
ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक 02035/02036 साठी आरक्षण सामान्य भाडे दराने 5 फेब्रुवारीपासून आरक्षण केंद्रावर तसेच संकेत स्थळावर सुरू होणार आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.



