भुसावळातील गोळीबार प्रकरणी संशयीत गोलू खरातची जामिनावर सुटका
भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद विकोपाला गेल्यानंतर समता नगरात भाजपाचे नगरसेवक स्व.रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात यांच्या घराबाहेर दोन गट भिडल्याची घटना सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 रोजी घडली होती. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आल्याने योगेश हिरालाल मोघे हा त्यावेळी जखमी झाला होता तर यावेळी गोळीबारही करण्यात आल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात गोलू उर्फ राजन रवीकांत खरात यास 24 डिसेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता त्यावर 10 रोजी सुनावणी होवून न्या.एस.पी.डोरले यांनी 25 हजारांच्या जात मुचलक्यावर संशयीताची मुक्तता केली. सरकारतर्फे अॅड.एस.डी.सोनवणे तर आरोपीतर्फे अॅड.एस.आर.पाल यांनी काम पाहिले.

