वरणगाव पालिकेतील भाजपाच्या पाच नगरसेवकांच्या अपात्रतेला तात्पुरती स्थगिती
माजी मंत्री एकनाथराव खडसे गटाला दिलासा : नगरविकास राज्यमंत्र्यांचा कारवाईला तात्पुरता ‘स्टे’
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेत गटनेता सुनील काळे यांनी काढलेला व्हीप झुगारल्याप्रकरणी दाखल याचिकेनंतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी वरणगावातील भाजपच्या पाच नगरसेवकांना 5 सप्टेंबर रोजी अपात्र केले होते. या आदेशाविरुद्ध नगरसेवकांनी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्याकडे अपिल दाखल केले होते. नगरसेविकांचे अपिल मंजूर झाले असून अपात्रतेच्या आदेशाला तात्पुरता स्थगिती देण्यात आली असून त्याबाबतचे आदेश राज्याचे कार्यासन अधिकारी योगेश पाटील यांनी शुक्रवारी काढल्याने वरणगावातील खडसे समर्थक गटाच्या नितीन माळी, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, विकीन भंगाळे या नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.
दोन वर्षानंतर ‘व्हीप’ प्रकरणाचा लागला होता निकाल
2017 मध्ये झालेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यावेळचे गटनेता सुनील काळे यांनी स्वतःलाच मतदान करण्याबाबत व्हीप बजावला होता मात्र व्हीप काढताना विश्वासात घेतले नाही म्हणून भाजपच्या आठ पैकी पाच नगरसेवकांनी सुनील काळे यांना गटनेते पदावरून हटवून नवीन गट नेतेपदी नितीन माळी यांची निवड केली होती. नितीन माळी यांच्या व्हीपनुसार अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, विकीन भंगाळे या पाच नगरसेवकांनी मतदान केले होते. याप्रकरणी भाजपमधील दोन्ही गटांनी एकमेकांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी केल्या होत्या. दोन वर्ष चाललेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर जिल्हाधिकार्यांनी गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी नितीन माळी, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे व विकीन भंगाळे यांना अपात्र केले होते.
अपात्रतेप्रकरणी राज्यमंत्र्यांकडे अपिल
अपात्र नगरसेवकांनी जिल्हधिकार्यांच्या निर्णयाविरुद्ध नगरविकास राज्य मंत्र्यांकडे अपिल दाखल केले होते. नगरविकास राज्यमंत्र्यांनी अपिल मंजूर केल्यानंतर शुक्रवारी शासनाचे कार्यासन अधिकारी प्रवीण पाटील यांनी पुढील आदेशापर्यंत पाचही नगरसेवकांच्या अपात्रतेला स्थगिती दिली आहे.
पक्षनिष्ठा सिद्ध झाली -सुनील काळे
ज्यांनी मला बंडखोर ठरवले होते न्यायदेवतेने त्यांना गद्दार ठरवले असून राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी म्हणाले.