पोलिस ठाण्याच्या आवारात थुंकणार्या शिक्षकाला पाच हजारांचा दंड
शिरपूर : विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणार्या शिक्षकानेच नियमांना तिलांजली देत कोरोना काळात शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गुटखा खाऊन थुंकल्याने या शिक्षकास न्यायालयाने पाच हजारांचा दंड सुनावला आहे. मिलिंद मधू बिरारे (वय 50, रा. भुपेशनगर, शिरपूर) असे या शिक्षकाचे नाव आहे. बिरारे यांनी 17 जून 2020 रोज, पोलीस स्टेशन आवारात गुटका खाऊन थुंकल्याने महेंद्र सपकाळ यांनी इतरांच्या जीवितास धोकादायक कृत्य व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यावरून शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी हवालदार गुलाब ठाकरे व ए.ए.काजी आणि कैलास पवार यांनी शिरपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. दाखल गुन्ह्यात न्यायालयात दोषारोप सिद्ध झाल्याने न्या.देशमुख यांनी शिक्षक मिलिंद मधू बिरारे यास पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.


