….तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार !
मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत
नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आता राज्य सरकार पुन्हा नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करीत असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरात पत्रकारांशी बोलताना दिले. मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे आदी गोष्टी नागरीकांनी पाळायला हव्यात. लग्न समारंभातील गर्दी टाळण्यासाठी आता आम्ही मंगल कार्यालयांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. शक्यतो, सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. लोकांनी काळजी घेतली नाही, तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असेही ते म्हणाले.
नागरीकांकडून नियमांना बगल
कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत मात्र वारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. ते कुठलीही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत. यामुळे आता काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले. सर्व जिल्हाधिकार्यांना अधिकार देण्यात आले आहेत. संबंधित जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या कोरोनाचा प्रसार आणि तेथील गर्दी, लक्षात घेऊन नाईट कर्फ्यूसंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील, असेही ते म्हणतील.

