अट्ठल घरफोड्या जळगाव जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
अनेक गुन्हे उघडकीस येणार : पाच लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त
जळगाव- जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीतील गांधी नगर भागात काही दिवसांपूर्वी सात लाख 66 हजारांची घरफोडी झाली होती. या गुन्ह्याप्रकरणी मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव) यास अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पाच लाख 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात जिल्हा पेठ पोलिसांना यश आले आहे.
जळगावातील घरफोडीची कबुली
गांधी नगरातील रहिवासी प्रा.डॉ. गीता बाळकृष्ण नेहते (वय 60) या कुटुंबीयांसह 21 जुलै 2019 रोजी नाशिक येथे गेल्याने च मोनूसिंग व त्याच्या साथीदाराने सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व काही वस्तू असा 7 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लांबवला होता तर चोरीनंतरही संशयीत या परीसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला मात्र ते निसटण्यात यशस्वी झाले होते. शुक्रवारी रात्री आरोपी मुंबई येथून रेल्वेने जळगावात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
यांनी आवळल्या मुसक्या
जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांच्या मागर्र्दर्शनाखाली डीबी प्रमुख तुषार जावरे, शेखर जोशी, अजीत पाटील, फिरोज तडवी, जगन सोनवणे, प्रशांत पाठक, महेंद्र बागुल, जितेंद्र सुरवाडे, प्रशांत जाधव, अविनाश देवरे, हेमंत तायडे आदींच्या पथकाने आरोपीला शनिवारी रात्री अटक केली. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.