सेवानिवृत्त पोलिसाचा मोबाईल लांबविला
जळगाव : महापालिकेच्या बहिणाबाई उद्यानाजवळील भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याचा आठ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना 3 मार्च रोजी सकाळी घडली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी प्रकाश रामा निंबाळकर (59, रा. अथर्व कॉलनी, जळगाव) हे 3 मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील महापालिकेच्या बहिणाबाई उद्यानासमोर असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी आले. भाजीपाला खरेदी करतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिश्यातील आठ हजार रूपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल चोरून नेला. आपल्या खिश्यात मोबाईल नसल्याने लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजीपाला मार्केटमध्ये विचारपूस केली. मात्र मोबाईलची कोणतीही माहिती मिळाली नाही. याप्रकरणी नजीकच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून सविस्तर माहिती दिली. प्रकाश निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाठक करीत आहे.

