यावलमधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती अखेर रद्द


सानेगुरुजी विद्यालयातील भरती जिल्हाधिकार्‍यांनी ठरवली रद्द : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या तक्रारीची दखल : पाच दिवसा खुलासा द्या, मुख्याधिकार्‍यांना आदेश

यावल- नगरपरीषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आलेली शिक्षकेतर भरती नियमबाह्य व शासनाची परवानगी न घेता केल्याने ती रद्द करावी, अशी तक्रार यावल नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील यांच्यासह इतर सहा नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे ककेली होती. तक्रारीत तथ्य आढळल्याने ही पद भरती रद्द करण्यात यावी व त्यानुसार अहवाल पाच दिवसाच्या आत पाठवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी यावल मुख्याधिकार्‍यांना दिल्याने यावलमधील राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्याध्यापक वाघ यांना कारणे दाखवा
यावल नगरपरीषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा शालेय समिती सचिव एस.आर.वाघ यांना महाराष्ट्र नागरी सेवा सिस्त व अपील 1979 च्या तरतुदीनुसार आपणावर शिस्तभंग विषयक कार्यवाही का प्रस्तावित करू नये? याबाबत तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत

फौजदारी कारवाई होणेसाठी तक्रार करणार
बोगस शिक्षकेतर भरती बाबत जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिनांक 6 जुलै 2019 रोजी भरती प्रक्रिया नियमबाह्य असून पदांना मान्यता देता येणार नाही, असे शालेय समिती अध्यक्ष व व सचिव असलेले मुख्याध्यापक वाघ यांना लेखी स्वरूपात कळविले होते. असे असूनदेखील मुख्याध्यापक वाघ यांनी नियमबाह्य भरती केलेल्या दोन कर्मचार्‍यांचे मंजुरीचे प्रस्ताव उपसंचालक, शिक्षण विभाग, नाशिक यांच्याकडे पाठवलेले आहेत. भरती प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे शिक्षण विभागाने कळवूनदेखील मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणे म्हणजे शासनाची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. यामध्ये भरती प्रक्रियेतील कर्मचार्‍यांनी नोकरी पोटी दिलेले पैसे परत मागू नयेत म्हणून केलेला हा खटाटोप आहे. ही बाब गंभीर असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील म्हणाले.


कॉपी करू नका.