भादलीतील दुचाकी चोर जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
बी.जे.मार्केटसमोरून दुचाकी लांबवल्याची कबुली : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
जळगाव : तालुक्यातील भादली येथील विजय अशोक कोळी (22, ज्ञानेश्वर मंदिराजवळ, भादली) यास चोरीच्या दुचाकीसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीने काही दिवसांपूर्वी बी.जे.मार्केट परीसरातून 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याची कबुली दिली. या दुचाकी चोरीबाबत जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल आहे. आरोपीने आणखी काही दुचाकी चोरल्याचा संशय असून तपासात ही बाब उघड होणार आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय अशोक महाजन, हवालदार शरीफोद्दीन काझी, युनूस शेख, सुरज पाटील, कमलाकर बागुल, दादाभाऊ पाटील, चालक व हवालदार इद्रीस पठाण यांनी भादली गावातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपी हा दुचाकीला बनावट क्रमांक लावून दुचाकी बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.